रायवाडी म्हणजे आक्षीच्याच वेशीवर वसलेली कोळी लोकांची एक टुमदार वस्ती. कोळ्यांची म्हणजेच मच्छीमारांची जेमतेम ३०-४० कुटुंब असलेली आणि आक्षी वरून नागांव ला जाणाऱ्या रस्त्याला अगदी चिकटून असलेली रंगी बेरंगी घरांची वस्ती म्हणजेच रायवाडी. रायगड जिल्ह्याच्या नकाशावर रायवाडीची नोंद सुमारे ६०० ते ७०० वर्ष तरी जुनी आहे. आक्षी गावामध्ये शिरतांना लागणाऱ्या पुला खालून जी खाडी वहाते तीच पुढे रायवाडीच्या ह्या वस्ती मागून थेट चौल गावा जवळच असलेल्या ‘वरांडे’ गावातल्या नदीशी जाऊन मिळते. आक्षी आणि अलिबागच्या मधे असलेल्या ह्या खाडीच्या पात्राला ‘बॅकवॉटर‘ म्हणायचं कारण म्हणजे ही खाडी अलिबाग-आक्षीच्याच्या मधे विस्तीर्ण पसरलेल्या तिवरांच्या म्हणजेच mangroves च्या दाट जंगलातून नागमोडी वळणे घेत अलिबागच्या समुद्राला म्हणजेच अरबी समुद्राला जाऊन मिळते.
रायवाडी मधल्या ह्या मच्छीमार कुटुंबीयांचा मुख्य उद्योग अर्थातच मासे मारी….. पुरुष मंडळी छोटी छोटी होडकीं घेऊन फार खोल समुद्रात नं जाता किनाऱ्या लगतंच मच्छीमारी करतात त्यामुळे त्यांना मुख्यतः बोईट( म्हणजे उंचीला साधारंण वित भर लांब पण चवीला मात्र अतिशय उत्कृष्ट असलेला एक मासा), तसंच छोट्या छोट्या कोलंब्या किंवा समुद्री खेकडे अगदी मुबलक प्रमाणात मिळतात. ह्या वस्तीचा दुसरा महत्वाचा जोडधंदा म्हणजे ‘ कालवं ‘ (Oysters) गोळा करणे. पण हे कामं रायवाडीतल्या जवळजवळ प्रत्येक कुटुंबातल्या स्त्रियाच करतात.

कालवं वेचताना रायवाडीतील स्त्रिया

जसं मच्छीमारी साठी समुद्राला भरती असावी लागते त्याच्याच अगदी उलट कालवं गोळा करायला मात्र पूर्ण ओहोटी लागते. समुद्राला एकदा का ओहोटी लागली की मग टोपल्या आणि खुरप्या घेऊन सर्व बायका खाडीच्या पात्रात कालवं वेचायला निघतात. खाडीच्या काही काही भागां मधे ओहोटीच्या वेळी थेट तळच दिसतो. दगडांवर चिकलेले ओबड धोबड शिंपले म्हणजेच ही कालवं, ती खुरपीच्या म्हणजेच छोट्या कोयत्याच्या मदतीने उकरून काढतात किंवा कधी कधी हे शिंपले त्या पाण्याच्या प्रवाहा बरोबर वहात येऊन वाळुत पण पडलेले सापडतात. मी तर ह्या पेक्षाही भन्नाट पद्धतीने कालवं गोळा करायची एक पद्धत बघितलेली. रायवाडीवरचा हा फोटो essay बनवताना मला रायवाडीच्याच गणेश भाऊंची खूप मदत झालेली. आम्ही गणेशच्या त्या निमुळत्या बोटीत बसून खाडीतून जात असताना एक बाई चक्क त्या खाडीतल्या पाण्यात उभी राहून आणि कमरेत थोडंसं वाकून तळातून काहीतरी काढतांना दिसली. विचारल्यावर कळलं की ती बाई नुसत्या पायाच्या स्पर्शानेच कालव्याचे शिंपले ओळखून मग ते वेचत होती. आणि ओहोटीला पुला खालच्या पाण्याची पातळी खूप कमी म्हणजे अगदी ३ ते ४ फूटच असते.

चक्क खाडीत उभं राहून कालवं वेचणारी बाई. पाणी hardly ३ ते ४ फूटच खोल आहे.
माझ्या हातात कॅमेरा होता आणि त्यातच सतत हेलकावणारी गणेशची छोटीशी होडी ….. ती कधीही पालटेल ह्या भीतीने मी अंग चोरून बसलेलो. पण त्या बाईला बघितल्यावर मात्र भीती थोडी कमी झाली. तरीही हातात कॅमेरा असल्याने मी पाण्यात उतरायच्या मोहाला आवर घातला.

कालव्यांचे शिंपले

गणेश भाऊ

साधारण २ ते ३ तास कालव्याचे हे शिंपले वेचण्याचा अथक परीश्रम केल्यानंतर पुढचं काम असतं ते म्हणजे घरी नेऊन ते शिंपले फोडणं आणि finally त्यातली कालवं बाजारात नेऊन विकणं. एकदम Unique अशी चव असलेला हा समुद्री मेवा जगभरात म्हणजे मुख्यतः युरोप अमेरिकेत Raw म्हणजे फक्त लिंबू आणि Sauces बरोबर तसाच खाण्याची पद्धत आहे. आपल्याकडे मात्र तो कांदा टोमॅटो आणि मसाल्या बरोबर परतून सुका किंवा कालवण करून खातात.

कालव्याचे शिंपले पहिल्यांदा थोडेसे फोडून मग ….

सुरीने open करायचे

कालवं

असा हा कालव्याच रस्सा भाकरी किंवा भाता बरोबर खायला अतिशय चविष्ट आणि तितकाच Healthy देखिल.